
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ तसेच हेमाडपंती बांधकाम शास्त्र्ााचा अद्भुत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील कायम चर्चेत असलेली संगमरवरी फरशी हटविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे गेल्या 45 वर्षांपासून फरशी खाली दडलेले अंतरंग समोर आले आहे. दरम्यान, आतापर्यंत 80 टक्के काम झाले असून, मुख्य गाभाऱयासह उर्वरित काम येत्या 15 दिवसांत पूर्ण होईल, अशी माहितीही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी दिली.
श्री अंबाबाई मंदिर हेमाडपंथी असून, मंदिराचे कोरीव शिल्पसौंदर्य जगभरातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा भाग आहे. काही भक्तांनी देवस्थान समितीला दान स्वरूपात दिलेली संगमरवरी फरशी 1976 साली मंदिराच्या अंतरंगात लावण्यात आली. त्याचा परिणाम मंदिरातील वाढत्या तापमानावर झाला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वादाचा मुद्दा बनलेली हीच संगमरवरी फरशी हटवून मंदिराचे मूळचे शिल्पसौंदर्य उजेडात आणण्याची मागणी विविध संघटनांसह भाविकांकडून करण्यात येऊ लागली. राज्य पुरातत्व विभागाने मंदिराच्या अंतरंगातील संगमरवरी फरशी हटविण्याच्या सूचना देवस्थान समितीला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 6 ते 7 वर्षांपूर्वी गाभाऱयाच्या प्रदक्षिणा मार्गातील भितींना लावलेली संगमरवरी फरशी हटविली होती. त्यानंतर मंदिराच्या संपूर्ण अंतरंगातील फरशी हटविण्याची मागणीही होऊ लागली.
देवस्थान समितीने नऊ महिन्यांपूर्वी हेरिटेज व आर्द्रता कमिटीकडे फरशी हटविण्यास शिफारस मागितली होती. काही दिवसांत या दोन्ही कमिटय़ांनी याबाबत परवानगी दिल्यानंतर अखेर गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी ही संगमरवरी फरशी काढण्यास सुरुवात झाली. आता गेल्या तीन आठवडय़ांपासून सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिरातील कासव चौक, गणपती चौकासह गरुड मंडपातील फरशी काढण्यात आली आहे. देवीच्या दर्शनास जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या पायऱयांना लावलेली फरशी काढण्यात आली. त्यामुळे या पायऱयांवरील नक्षीकाम तसेच कासव आणि गणपती चौकातील जमिनीचे मूळ दगडी रूपही उघड झाले आहे. श्री अंबाबाईसह, महासरस्वती, महाकाली मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, व्हीआयपी गेटसमोरील परिसर, खजिना चौक, मातृलिंगकडे जाणाऱया पायऱया, श्रीयंत्र या भागातील संगमरवरी फरशी काढली आहे. त्यामुळे मंदिराच्या अंतरंगातील मूळ नक्षीकाम दिसू लागले आहे.

































































