
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि फैलाव रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून योजलेल्या प्रतिबंधांमुळे वर्षा पर्यटन स्थळांवर बंदी आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसाने सध्या पर्यटनस्थळे बहरली आहेत, नदी-नाल्यांसह धबधबेही ओसंडून वाहत असताना पर्यटकांअभावी या स्थळांना पोरकेपणा आल्याचे चित्र आंबोली-आजरा परिसरात दिसत आहे. मागील वर्षी महापुराने आणि आता कोरोना पार्श्वभूमीवरील प्रतिबंधांमुळे या स्थळांवरील व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
पाऊस बरसू लागला की आजरा-आंबोली परिसर स्वप्नवत हिरवाई लेवून निसर्ग पर्यटकांच्या स्वागतास सज्ज होतो. या परिसरासह आसपासच्या जिल्ह्यातील वर्षा पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी येथील पर्यटनस्थळांकडे झेपावू लागतात. मात्र गेल्या वर्षीचा महापूर आणि आता कोरोना प्रादूर्भावाने यास खिळ बसल्याचे चित्र अधोरेखित झाले आहे. अशा वातावरणात निसर्ग प्रेमींच्या उत्साही गर्दीने अखंड गजबजणारा आंबोली आणि रामतीर्थचा धबधबा असा निर्जन बनल्याची सल अनेकांना टोचत आहे. पण प्रतिबंधामुळे पर्यटकच येथे फिरकत नसल्याने हा गजबजणारा परिसर सध्यातरी ओस पडला आहे. याचा परिणाम अर्थातच या परिसरातील पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या लहान-मोठ्या व्यावसायिकांवर होणार आहे. गेल्या वर्षीचा महापूर आणि यावेळची कोरोना महामारी या सर्वांचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे.

























































