भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण, आनंद तेलतुंबडेंच्या कोठडीत 25 एप्रिलपर्यंत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
activist-anand-teltumbde

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने आज नकार दिला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या अधिक चौकशीकरिता पोलिसांनी तेलतुंबडे यांची कोठडी वाढवून मागितली. त्यानुसार 25 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले.

भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला अटक होऊ नये म्हणून गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी गेली दोन वर्षे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केले. हायकोर्टाने 14 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना चार आठवडय़ांचा अवधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या दोघांचे अर्ज फेटाळल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवडय़ात प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएच्या मुख्यालयात शरणागती स्वीकारली त्यांना अटक करण्यात आल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना कोठडीची शिक्षा सुनावली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक तपासासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करून देण्याची मागणी एनआयएकडून करण्यात आली याची दखल घेत न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 25 एप्रिलपर्यंत वाढ केली.