
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवास गुरुवारी पहाटे सुरुवात झाली. गतवर्षी कोरोनामुळे भाविकांना यात्रा प्रवेश नव्हता. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी होत असलेल्या यात्रोत्सवात भाविकांसह नेतेमंडळींची मांदियाळी दिसून आली.
परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार रमेश कोरगावकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यासह अन्य नेतेमंडळी शिवसेना पदाधिकारी यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, यासह अन्य भाजप पदाधिकारी तसेच मनसे आमदार राजू जाधव, अविनाश जाधव यासह अन्य नेतेमंडळी तसेच टीव्ही कलाकार दिगंबर नाईक, भूषण कडू यासह अन्य महनीय व्यक्ती यांनी देवीचे दर्शन घेतले.
11 विविध रांगांमधून भाविकांना देवीचे दर्शन दिले जात आहे. मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास मनमोहक ठरली. जय जय भराडी देवीच्या गजराने आंगणेवाडी परिसर दुमदुमून गेला. आंगणे कुटुंबीय, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासह भाविकांना सुलभ व्यवस्था मिळावी यासाठी सेवा बजावत आहेत.
मालवणी खाजा व प्रसादाच्या दुकानातही भाविकांची गर्दी दिसून येत आहे. हॉटेलमध्येही गर्दी होती. खेळणी, चादरी व अन्य साहित्य दुकानेही सजली होती. रात्री देवीला प्रसाद लावणे सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सायंकाळी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
आंगणेवाडीतील पाण्याचा प्रश्न मार्गी निघणार
आंगणेवाडीत पाण्याचा प्रश्न ही मोठी समस्या आहे. आंगणेवाडीत पुरेश्या पाण्याची सोय करून पुढील आंगणेवाडी यात्रे पूर्वी येथील पाणी प्रश्न निकाली काढणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. तसेच अन्य काही प्रश्न समस्या असल्यास तसेच अधिक सोई सुविधा द्यायाच्या असतील तर राज्य शासनाच्या माध्यमातून त्या दिल्या जातील असे खासदार राऊत म्हणाले.
ईडीच्या दुरुपयोग दुर्दैवी
केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडी व अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. हे सर्व दुर्दैवी पद्धतीने सुरू आहे. मात्र याची किंमत केंद्र सरकारला आगामी निवडणूकांतून मोजावी लागेल. असेही खासदार राऊत, आमदार दीपक केसरकर म्हणाले.




























































