Video – अलका लांबा यांनी ‘आप’ कार्यकर्त्याच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षात प्रमुख लढत होत आहे. शनिवारी दिल्लीमध्ये सगळ्या 70 जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. या मतदानादरम्यान वादावादीचे प्रसंग पाहायला मिळाले.दिल्लीतील मजनू टीला भागामध्ये काँग्रेस आणि आपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनी आपच्या एका कार्यकर्त्याच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला. लांबा यांनी ज्याला कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला त्याचे नाव हरमेश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

लांबा यांनी आरोप केला आहे की ज्याला त्यांनी कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला त्याने अत्यंत घाणेरडी शिवी दिली होती. लांबा या पूर्वी ‘आप’ मध्येच होत्या मात्र त्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लांबा या गेल्या विधानसभा निवडणुकीत चांदणी चौक मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आपमध्ये येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या अलका लांबा यांचे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत खटके उडाले होते. या वादावादीमुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये सामील झाल्या.

लांबा यांनी दावा केला आहे की ‘आप’ च्या कार्यकर्त्याने त्यांना त्यांच्या मुलावरून अपशब्द वापरले. त्याने इतकी घाण शिवी दिली की मी सांगूही शकत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. अलका लांबा यांनी या कार्यकर्त्यावर हात उचलल्यानंतर पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यात नेला.