आपच्या आमदारांना विधानसभेत जाण्यापासून रोखले, आपची निदर्शने

दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून हटवल्यावरून आम आदमी पार्टीने प्रचंड गदारोळ केल्याने ‘आप’चे सर्वच्या सर्व 22 आमदारांना निलंबित करण्यात आले. अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी आम आदमी पार्टीच्या आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या अतिशी यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’च्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर ‘जय भीम’चे पोस्टर घेऊन जोरदार निदर्शने केली. दरम्यान, याप्रकरणी अतिशी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून भाजपने हुकूमशाहीची मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला.

सरकारमधील विविध कार्यालयांमध्ये असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे पह्टो हटवण्यात आले असून हा केवळ देशाच्या शूर सुपुत्रांचाच नव्हे तर दलित, मागासवर्गीयांचाही अवमान आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.