‘आप’चे सीबीआय कार्यालयाबाहेर संतप्त आंदोलन; केजरीवाल यांची नऊ तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी आज सीबीआयने तब्बल साडेनऊ तास दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली. सीबीआयने आपल्याला विविध 56 प्रश्न विचारले, त्याला आपण सरळ आणि स्पष्ट उत्तरे दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच आपल्याकडे काही लपवण्यासारखे नाही. पेंद्र सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणू पाहत आहे, पण त्याला आम आदमी पक्ष घाबरणार नसल्याचे त्यांनी ठणकावले.

अरविंद केजरीवाल सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी सीबीआय कार्यालयात गेले होते. त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर रात्री 8.30 च्या सुमारास ते बाहेर आले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेलेल्या आपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तत्काळ सोडून दिले.

हे गलिच्छ राजकारण

मद्य घोटाळा प्रकरण पूर्णपणे बनावट आहे. पेंद्रातील मोदी सरकार आम आदमी पक्षाला संपवू पहात आहे. हे मोदी सरकारचे गलिच्छ राजकारण आहे. पण आप कट्टर इमानदार पक्ष असून आम्ही मरू परंतु कधीच इमानदारीशी समझोता करणार नाही असे केजरीवाल यांनी बजावले. देशाची जनता आमच्यासोबत आहे, सत्यासोबत असल्याचेही ते म्हणाले.

सीबीआय कार्यालयाला हजारो पोलिसांचा गराडा

अरविंद केजरीवाल चौकशीसाठी येणार असल्यामुळे आप कार्यकर्त्यांची गर्दी उसळणार, हे लक्षात घेत हजारो पोलिसांनी सीबीआय कार्यालयाला गराडा घातला. याशिवाय पेंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही तैनात करण्यात आले. एवढा तगडा बंदोबस्त असतानाही आप कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर संतप्त निदर्शने केली.

सीबीआय कार्यालयात हजर होण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना नमन केले. त्यानंतर त्यांनी ‘आप’च्या कार्यकर्त्यांसाठी एक व्हिडीओ जारी केला. त्यात मी काही चुकीचे केले नाही, माझ्याकडे लपवण्यासाठी काही नाही. ते खूप शक्तिशाली आहेत. ते कुणालाही तुरुंगात पाठवू शकतात, असे म्हटले आहे. सीबीआय कार्यालयात जाताना केजरीवाल यांच्यासोबत दिल्ली सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री भगवंत मानदेखील होते.