गोरगरीबांना परवडणारी आरे दूध योजना जगवा! आमदार सुनील प्रभू यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावमध्ये असलेली आरे डेअरी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आरे डेअरीत निर्माण होणाऱया दुधाला बाजारात कमी मागणी असली तरी हे दूध सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबांना परवडणारे आहे. या दुधाची वितरण व्यवस्था सुधारून गोरगरीबांना परवडणारी ‘आरे’ डेअरी जगवा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना केली.

मुंबई परिसरात दुधाचा पुरवाठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी सक्षम वितरण व्यवस्था व प्रसारण व्हावे यासाठी आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे. या आरे डेअरीमधील अतिरिक्त दुधाचे दूध भूकटीमध्ये रूपांतर करून व या भुकटीची निर्यात व वितरण करण्यासाठी आवश्यक अनुदानाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.

मालाडमधील रस्तेव्यवस्था सुधारा

मालाड पूर्वेकडील मालाड जलाशय टेकडी मार्गे, कांदिवली लोखंडवाला संकुलदरम्यानच्या रस्त्यांची काँक्रीटीकरण सुरू आहे. या रस्त्याच्या मध्य भागातील 1300 पैकी 400 मीटर रस्ता वन विभागाच्या हद्दीत आहे. वन विभागाच्या परवानगीअभावी या भागातील रस्त्याचे काम थांबले असून सरकारने वन विभागाची परवानगी मिळविण्यासाठी कार्यवाही करावी. कुरारगाव लक्ष्मणनगर येथील संस्कार कॉलेजजवळचा रस्ता हा महापालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये रस्त्यासाठी आरक्षित आहे. या जागी 300 झोपडय़ा असून या झोपडीधारकांना 269 चौरस फुटांचे घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली. पुष्पा पार्क पादचारी भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ दोन वर्षांपूर्वी होऊनही या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असून हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना प्रभू यांनी केली.