इंटरनेटशिवाय आसाममधील जनता तुमचं ‘ट्वीट’ वाचू शकत नाही, काँग्रेसचा पंतप्रधानांना टोला

785

नागरिकत्व (सुधारणा) विधेयक संसदेत केंद्र सरकारने मंजूर करून घेतले असले तरी ईशान्य हिंदुस्थानात उद्रेक उसळला आहे. राज्यात प्रचंड हिंसाचार भडकला असून जाळपोळ सुरू आहे. गुवाहाटीत संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता राखण्याचे तसेच तुमचे हक्क कुणीही हिरावून घेत नसल्याची ग्वाही त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. मात्र गुवाहटीमध्ये आसाममधील इंटरनेट सेवाच खंडित केलेली असल्याने आसाममधील जनता तुमचा संदेश वाचू शकत नसल्याचा टोला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी ट्वीट करत आसामवासीयांना एक आवाहन केले होते. ‘मला आसाममधील माझ्या बहिणी व भावांना ही खात्री द्यायची आहे की नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्याने तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. तुमचा कोणताही हक्क, तुमची ओळख आणि तुमची संस्कृती अशीच वाढत व बहरत राहिल’, असे मोदींनी ट्वीट केले आहे. त्यांचे हे ट्वीट रिट्वीट करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ‘आपले आसाममधील बहिण व भाऊ तुमचा हा त्यांना आश्वासन देणारा संदेश वाचू शकत नाही. तुम्ही विसरले असाल पण त्यांची इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे’, असे काँग्रेसने ट्विट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या