
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने सोमवारी आशा कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आवारात जोरदार निदर्शने करत धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये आशा कर्मचार्यांना जाहीर केलेले वाढीव मानधन त्वरीत मिळावे, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनात आशा आणि गटप्रवर्तक महिलांना अडीच हजार आणि आठ हजार असे मानधन मिळते. हे मानधन अत्यल्प आहे. त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढवून मिळावे ही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा. देशातील काही राज्यात आशा स्वयंसेविकांना दहा हजार मानधन दिले जाते, मग महाराष्ट्रातील आशांना मानधन कमी का, असा सवालही आंदोलनकर्त्यांनी विचारला. त्याचबरोबर आशा कर्मचाऱ्यांचे जाहीर केलेले वाढीव मानधनही त्वरीत मिळावे ही मागणी यावेळी करण्यात आली.



























































