
>>आशुतोष बापट
बेळगावच्या दक्षिणेला सुमारे 180 कि.मी. अंतरावर शिरसी हे कर्नाटकातले सुंदर गाव. धबधबे, जंगले, मंदिरे आणि गर्द झाडी असा हा सर्वांगसुंदर प्रदेश आहे. शिरसी हे तालुक्याचे ठिकाण मध्यवर्ती ठेवून या परिसरात मनसोक्त भटकंती करता येते. पश्चिम घाटात अगदी मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी असणारा शिरसीचा परिसर निसर्ग, पक्षी आणि मंदिर अभ्यासक या सर्वांनाच खुणावतो. .
आपला सख्खा शेजारी असलेला कर्नाटक महाराष्ट्राप्रमाणेच विविधतेने नटलेला आहे. सह्याद्रीच्या रांगा, समुद्र, थंड हवेची ठिकाणे, धबधबे, विपुल निसर्गसंपदा याबरोबर इथे प्राचीन राजवटींनी निर्माण केलेली समृद्ध मंदिरे आणि त्यावर असलेले सुंदर मूर्तिकाम या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. शिरसी आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असाच मनसोक्त फिरावा असा आहे. एका बाजूने घाटमाथ्याचे सान्निध्य लाभलेला हा प्रदेश गर्द वनश्रीने नटलेला असल्यामुळे निसर्गाची विविध रूपे इथे न्याहाळता येतात. बेळगावच्या दक्षिणेला सुमारे 180 कि.मी. अंतरावर शिरसी हे कर्नाटकातले सुंदर असे गाव. धबधबे, जंगले, मंदिरे आणि गर्द झाडी असा हा सर्वांगसुंदर प्रदेश आहे. 
शिरसी हे तालुक्याचे ठिकाण मध्यवर्ती ठेवून या परिसरात मनसोक्त भटकंती करता येते. शिरसी हे पश्चिम घाट परिसरातील अगदी मध्यवर्ती आणि मोक्याचे ठिकाण. ‘यक्षगान’ ही कर्नाटकातील प्रसिद्ध लोककला. शिरसी हे या लोककलेचे केंद्रच म्हणायला हवे. महाराष्ट्रात जसा दशावतार तसाच कर्नाटकातील यक्षगान. शिरसीची अजून एक ओळख म्हणजे सुपारीच्या व्यापाराचे हे एक मोठे केंद्र म्हणून नावारूपाला आलेले आहे. अघनाशिनी नदीचा उगम शिरसीच्या जवळच झालेला आहे. या नदीवर बरेच धबधबे पाहायला मिळतात. इथून जवळ असलेल्या ठिकाणांपैकी मुद्दाम पाहिलेच पाहिजे असे ठिकाण म्हणजे ‘याना रॉक्स’. शिरसीपासून 40 किमीवर असलेल्या या ठिकाणी जाणारा रस्ता गर्द झाडीतून वळणावळणाचा आहे. जिथे रस्ता संपतो तिथून अर्धा कि.मी. पायी चालत जावे लागते. उंचच उंच झाडे आणि सोबतीला पक्ष्यांचे आवाज यामुळे हा रस्ता कधी संपूच नये असे वाटते. दोन प्रचंड उंच खडक इथे आपल्या स्वागताला उभे असतात. जणू काही पाषाण शिखरेच ही. ‘भैरवेश्वर’ आणि ‘मोहिनी’ अशी नावे असलेल्या या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 120 मीटर आणि 90 मीटर इतकी आहे. विष्णूने मोहिनीरूप घेऊन भस्मासुराचा वध याच ठिकाणी केला अशी आख्यायिका इथे प्रसिद्ध आहे. याना हे ठिकाण एक तीर्थक्षेत्र म्हणूनसुद्धा ओळखले जाते. एका पाषाणखंडाखाली पोकळ जागा असून इथे एक शिवपिंड ठेवलेली आहे. त्यावर खडकातून सतत पाण्याचा अभिषेक होत असतो. शिवरात्रीला इथे मोठा रथोत्सव साजरा केला जातो. चहूबाजूंनी जंगलाने वेढलेल्या या जागी अवश्य भेट द्यावी. मनाची शांतता आणि एकाग्रता साधण्यासाठी ही जागा अगदी उत्तम आहे. याना रॉक्सपासून परत मुख्य रस्त्याला येऊन आपण उंचाली धबधब्याकडे जाऊ शकतो. शिरसीपासून हे ठिकाण 38 किमीवर आहे. अघनाशिनी नदी इथे 120 मीटर उंचीवरून खोल दरीत झेप घेते. गर्द झाडीतून येणारी नदी काहीशी तिरक्या कोनात दरीत कोसळते. त्यामुळे इथे तयार झाला आहे उंचाली धबधबा. इथे पर्यटकांची हुल्लडबाजी अजिबात नसते. धबधबा वेगवेगळ्या उंचीवरून पाहता यावा म्हणून इथे वन विभागाने डोंगरउतारावर वेगवेगळय़ा उंचीवर मनोरे उभे केलेले आहेत. अगदी खालच्या मनोऱयावरून होणारे धबधब्याचे रौद्र दर्शन फारच सुंदर असते. या परिसरात विविध रंगांची आणि आकारांची फुलपाखरे मोठय़ा संख्येने दिसतात. याना रॉक्स आणि उंचाली धबधबा बघितल्यावर प्राचीन कदंब साम्राज्याची राजधानी असलेल्या बनवासीला जायलाच हवं.
बनवासी हे कदंब राजांचे एकेकाळी राजधानीचे शहर होते. खरं तर कर्नाटकची मूळ राजधानी बनवासीच होती असे सांगितले जाते. शिरसीपासून फक्त 25 कि.मी. अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाण. गावाच्या तिन्ही बाजूंनी ‘वरदा’ नदी वाहते. इथे असलेले मधुकेश्वराचे मोठे मंदिर आवर्जून बघण्यासारखे आहे. इ.स.च्या नवव्या शतकात कदंब राजवटीमधे बांधलेले हे मंदिर. अत्यंत आकर्षक आणि गुळगुळीत चमक असलेले खांब आणि विविध आभूषणांनी मढवलेली नंदीची प्रतिमा ही कल्याणी चालुक्यांची खासीयत या मंदिरात बघायला मिळते. मंदिराच्या प्रशस्त आवारात अष्टदिक्पालांची छोटी छोटी मंदिरे आहेत. त्यात हे दिक्पाल आपल्या पत्नी आणि वाहनासह शिल्पांकित केलेले आहेत. पाच फण्यांच्या नागाचे सुंदर शिल्प आणि एक भव्य आणि इंचन्इंच कलाकुसरीने मढवलेला दगडी पलंग मंदिर परिसरात ठेवलेला आहे. हा दगडी पलंग इ.स. 1628 साली रघुनाथ नायक या राजाने मंदिराला देणगी म्हणून दिला.
बनवासीला मुक्काम करून पुढे बळ्ळीगावी इथले केदारेश्वर मंदिर न चुकता पाहावे. गावातले मानवी रूपातील ‘गंडभेरुंड’ शिल्प फारच देखणे आहे. होयसळांची राणी शांतला हिचे माहेर म्हणून हे गाव ओळखले जाते. इ.स.च्या 11-12व्या शतकात बांधलेले केदारेश्वर मंदिर हे कल्याणी चालुक्य राजवटीत शैव अध्ययन केंद्र होते. याचा उल्लेख दक्षिण केदार असा केला जातो. तीन गाभारे असलेले हे शिल्पसमृद्ध मंदिर सुंदर आहे. निसर्गरम्य शिरसी परिसरात मनसोक्त भटकताना वेळेचे भान हरपले जाते. खास दक्षिणी खाद्यपदार्थ आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग बघून आपल्याला इथून हलूच नये असेच वाटते. निसर्ग, पक्षी आणि मंदिर अभ्यासक या सर्वांनाच हा परिसर खुणावतो आहे. पर्यटकांची झुंबड नसल्यामुळे हा परिसर अजूनही शांत आहे. आपल्या भटकंतीत तो तसाच शांत राहावा याची काळजी मात्र आपण घ्यायला हवी.





























































