सब लेफ्टनंट आस्था पुनियाने रचला इतिहास, हिंदुस्थानच्या नौदलात बनली पहिली महिला फायटर पायलट  

आता भारतीय नौदलात पहिल्यांदाच एक महिला फायटर पायलट बनल्या आहेत. सब-लेफ्टनंट आस्था पुनिया यांना नौदलात फायटर पायलट बनवण्यात आले आहे. भारतीय नौदलात आधीच टोही विमान आणि हेलिकॉप्टर प्रवाहात महिला पायलट आहेत. परंतु आस्था लढाऊ विमान उडवणार आहेत. देशाच्या सुरक्षेत नौदल महत्त्वाची भूमिका बजावते. आता यामध्ये आस्था पुनिया यांची जबाबदारी अधिक वाढणार आहे. नौदलाने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती देखील दिलेली आहे.

भारतीय नौदलाने एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. यात आस्था पुनियाचा फोटो सोबत नौदलाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “नौदलाच्या हवाई दलात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. भारतीय नौदलाने (3 जुलै) नौदल हवाई तळावर दुसरा बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्स पूर्ण करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. लेफ्टनंट अतुल कुमार धुळ आणि एसएलटी आस्था पुनिया यांना रिअर अॅडमिरल जनक बेवली, एसीएनएस (हवाई) यांनी ‘विंग्स ऑफ गोल्ड’ प्रदान केले.”

आस्थाला कोणते लढाऊ विमान मिळेल याबद्दल अद्याप अधिकृत माहिती नाही. भारतीय नौदलाकडे काही विशेष प्रकारचे लढाऊ विमान आहेत, जे आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रांतमधून उड्डाण करू शकतात. नौदलाकडे मिग-29 लढाऊ विमान आहे. ते विशेषतः डिझाइन केलेले आहे. त्याची लढाऊ श्रेणी 722 किमी आहे. तर सामान्य श्रेणी 2346  किमी आहे. ते 450 किलो वजनाचे चार बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.