
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचे वीरपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे शुक्रवारी हिंदुस्थानात परतले. हिंदुस्थानने बालाकोट येथे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यावेळी अभिनंदन यांनी F-16 हे अमेरिकन बनावटीचं विमान पाडलं होतं. अतिशय आधुनिक अशा बनावटीचं हे विमान पाडणारे अभिनंदन हे प्रथम हिंदुस्थानी वैमानिक बनले आहेत.
अभिनंदन ज्या विमानात बसले होते, ते मिग-21 बिसन हे विमानही शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होतं. मात्र, F-16 हे अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेलं लढाऊ विमान आहे. या दोघांमध्ये समान ताकदीची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. पण, अशा प्रकारच्या हवाई चकमकीसाठी F-16 हे विमान अतिशय ताकदीचं मानलं जातं. मिग -21 या विमानांची रचना F-16 या विमानापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे F-16 ला हवाई चकमकीत मात देणं ही आजवर अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र, ती शक्य करून दाखवत अभिनंदन यांनी हिंदुस्थानी युद्धइतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

























































