कोल्हापुरात लाच घेऊन फरार झालेल्या उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला अटक 

कोल्हापुरात उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलने मटका कारवाईत सह आरोपी न करण्यासाठी लाच घेतली होती. आज एसीबीने दोघांना अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर या कारवाईत सहआरोपी न करण्यासाठी एका तरुणाकडे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, कॉन्स्टेबल रोहित पोवार व त्यांचा मित्र रोहित सोरप यांनी 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 20 हजार रुपये त्यांनी घेतले होते. राहिलेल्या 40 हजारांसाठी तगादा लावला होता. यासंदर्भात तक्रारीनंतर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शनिवारी रोजी पोलिसांचा मित्र रोहित सोरप याला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव व कॉन्स्टेबल रोहित पोवार हे दोघे फरारी झाले होते.त्यांना आज रात्री अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालत हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या