मंत्रिमंडळ निर्णय – नागपूरमध्ये धावणार एसी ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर शहर व परिसरात रेल्वेच्या सध्याच्या पॅसेंजर ट्रेन्सऐवजी आधुनिक प्रकारच्या वातानुपुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन्स सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस) ही सेवा जोडली जाईल. महामेट्रोने यासाठी 333.60  कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सादर केला आहे. यामुळे नागपूरकरांचा प्रवास वेगवान आणि गारेगार होणार आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचे सहाय्य म्हणून 21 कोटी 30 लाख रुपये राज्याकडून बिनव्याजी दुय्यम कर्जसहाय्य म्हणून देण्यात येईल.  या व्यतिरिक्त भविष्यात देखील राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.  महामेट्रो, राज्य सरकार व  रेल्वेमध्ये झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मंजुरीही देण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा खर्च नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-1 या प्रकल्पासाठी केएफडब्ल्यू या वित्तीय संस्थेच्या  305 कोटी 20 लाख रुपये या मंजूर कर्ज सहाय्यामधून करण्याचे प्रस्तावित आहे.

वेगवान आणि आरामदायी प्रवास; 42 स्थानके उभारणार

ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नागपूर ते वर्धा, नागपूर ते नरखेड, नागपूर ते रामटेक आणि नागपूर ते भंडारा रोड या मार्गांवर सुरू होणार असून यामध्ये 42 स्थानके उभारण्यात येतील. या प्रकल्पामुळे नागपूरकरांचा प्रवास अतिशय वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाला अधिकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ दिल्यामुळे काही विषयांना मंजुरी देण्यास विलंब लागू नये म्हणून 2020-21 या वर्षासाठी महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार संचालक मंडळास देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.