
मध्य रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलला आता थंडी संपू लागल्याने जसजसा उन्हाळा सुरू होईल तसतसा प्रतिसाद मिळण्याची आशा वाढली आहे. तरीही ही एसी लोकल ‘फ्लॉप’ होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावरील चार बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आणि आठ मॉलशी प्रवाशी मिळण्यासाठी बोलणी चालू केली आहेत.
मध्य रेल्वेवर 31 जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेसाठी ठाणे ते वाशी-नेरूळ-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलचा प्रवास दणक्यात सुरू झाला खरा, परंतु या लोकलला म्हणावे तसे प्रवासी मिळत नसल्याचे उघड झाले आहे. ट्रान्स हार्बरवर दिवसभरात 16 फेऱ्या होत असूनही एसी लोकलला दिवसभराचे केवळ 1000 प्रवाशी कसेबसे मिळत आहेत. एसी लोकलच्या एका फेरीला अवघे 60 प्रवासी लाभत असून एका एसी लोकलची क्षमता तब्बल 5,964 प्रवासी इतकी आहे. त्यात 1028 आसने असून 4,936 उभे प्रवासी त्यात सामावू शकतात. इतकी प्रवासी क्षमता असताना एसी लोकलला 1000 ते 1400 प्रवासी लाभत आहेत. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलच्या 12 फेऱ्या होत असून त्यात केवळ दोनच फेऱ्या पिकअवरच्या गर्दीत होत असतात. याउलट मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर 16 फेऱ्या होत असून त्यातील बहुतांश फेऱ्या सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरच्या गर्दीत असूनही तिला प्रवासी मिळत नसल्याने ही एसी लोकल ‘फ्लॉप’ होते की काय अशी मध्य रेल्वेला चिंता भेडसावत आहे.
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी एसी लोकलला प्रवासी लाभण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावरील कॉर्पोरेट कार्यालयात एसी लोकलचा प्रचार करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने आठ मॉल आणि चार बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क केला आहे. ठाणे, वाशी, ऐरोली आणि पनवेल येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना एसी लोकलचा प्रवास वेळेची बचत आणि प्रदूषणमुक्त असल्याचे पटवून देण्यात येत आहे. आठ मॉलशीदेखील संपर्क करण्यात येत असून मॉलमध्येही कार्यरत कार्यालये तसेच कर्मचाऱ्यांना ओला, उबरनी ट्रफिकमध्ये अडकण्यापेक्षा एसी लोकलचा सिझन पास काढण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.




























































