एसी लोकलमध्येही सेकंड क्लास सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार

283

मध्य रेल्वेने पहिली एसी लोकल सेवा ट्रान्सहार्बर मार्गावर सुरू केली. या लोकलला अजूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या लोकलसाठीची प्रवासी संख्या कशी वाढवायची याचा बराच विचार सध्या रेल्वेचे अधिकारी करत आहेत. यातून एसी लोकलमध्येही सेकंड क्लास सुरू करावा अशी कल्पना पुढे आली आहे. हा विचार प्रत्यक्षात आला तर एसी लोकलमध्येही सर्वसाधारण लोकल गाड्यांप्रमाणे फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास असे दोन वर्ग तयार करण्यात येतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर दिवसाला 12 फेऱ्या चालवण्यात येतात.नव्या फेऱ्यांऐवजी साध्या धावत असलेल्या लोकलऐवजी या 12 फेऱ्या पूर्ण करण्यात येत आहे. यामुळे प्रवासी वैतागले आहेत. मध्य रेल्वेकडे आता 3 एसी लोकल गाड्या असून चौथी लोकल ही लवकरच मुंबईत पोहोचणार आहे. असं असूनही नव्या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतलेला नाहीये.

मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक डी.के.सिंह यांनी रेल्वे बोर्डाच्या सदस्यांसमोर एक अहवाल ठेवला आहे, यामध्ये त्यांनी एसी गाड्यांचे तिकीट दर हे साध्या गाड्यांच्या दरापेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याने आणि सध्या अत्यल्प मार्गांवरून ही लोकल धावत असल्याने अपेक्षित प्रवासी वाढ झालेली नाही. या दोन कारणांमुळेच मध्य रेल्वेचे प्रवाशांनी एसी लोकलला थंडा प्रतिसाद दिल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर 10 टक्के प्रवासी हे फर्स्ट क्लासने तर 90 टक्के प्रवासी सेकंड क्लासने प्रवास करतात असंही या अहवालात म्हटलं आहे.

सिंह यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलंय की जर एसी लोकलमध्ये सेकंड क्लास तयार करण्यात आला तर त्याचे तिकीट हे विना एसी लोकलच्या सेकंड क्लास पेक्षा जास्त आणि विना एसी लोकलच्या फर्स्ट क्लासपेक्षा कमी असावे. जर परवडणाऱ्या दरात तिकीट मिळाले तर सर्वसाधारण लोकलच्या सेकंड क्लासने प्रवास करणारे एसी लोकलकडे वळू शकतील आणि त्याला मिळणारा प्रतिसाद वाढायला लागेल.

एसी लोकलमध्ये सेकंड क्लास सुरू करण्यात आला तर त्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीटाचे दर हे दिल्ली मेट्रोच्या दराप्रमाणे असावे असा प्रस्ताव आहे. दिल्ली मेट्रोचे किमान भाडे हे 10 रुपये तर कमाल भाडे हे 60 रुपये आहे. एकापेक्षा जास्त एसी लोकल गाड्या धावायला सुरुवात झाल्यानंतर तिकीटाचे दर हळू हळू वाढवता येतील असाही प्रस्ताव देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या