ऑक्टोबर हीटमध्ये पश्चिम रेल्वेवर दोन एसी लोकलची गारेगार हवा

308

पश्चिम रेल्वेवर सध्या विरार ते चर्चगेट एसी लोकलच्या 12 फेऱया होत असल्या तरी ऑक्टोबरपासून दुसरी एसी लोकलही सेवेत येणार असल्याने गारगार एसी लोकल फेऱयांची संख्या वाढणार आहे. मात्र त्यामुळे साध्या लोकलच्या फेऱया कमी होणार असल्याने प्रवाशांना त्यासाठी तयार राहावे लागणार आहे. साध्या लोकलच्या किमान 22 ते 24 फेऱयांवर या दोन वातानुकूलित लोकलच्या एकत्रित चालविल्याने परिणाम होणार असून त्यावर गदा येणार आहे.

ही दुसरी वातानुकूलित लोकल सर्व सोपस्कारानंतर सेवेत आणण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारपासून ही लोकल पश्चिम रेल्वेवर धावत असून आधीची एसी लोकल देखभालीसाठी यार्डात पाठविण्यात आली आहे. साधारण एक ते सवा महिन्यानंतरच जुनी वातानुकूलित लोकल पुन्हा सेवेत येईल असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

चाचण्यांनंतर समावेश
पश्चिम रेल्वेवर नुकतीच तिसरी वातानुकूलित लोकलही विरार कारशेडमध्ये दाखल झाली आहे, मात्र एकाच वेळी दोन वातानुकूलित लोकलचा प्रत्यक्ष लाभ ऑक्टोबर किंवा त्यानंतरच प्रवाशांना मिळणार आहे. देखभालसाठी गेलेली पहिली एसी लोकल पुन्हा सेवेत आल्यानंतरच दुसरी लोकल चालवण्यात येणार आहे. तर तिसऱया एसी लोकलच्याही महिनाभर चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच तिसरी एसी लोकल सेवेत येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या