
जमिनीच्या गुंठेवारी पोटविभागणीच्या फायलीवर मुख्याधिकाऱ्य़ांची सही घेऊन काम पूर्ण करून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेणाऱया इचलकरंजी पालिकेच्या नगररचना अभियंत्यासह त्याच्या पंटरला ‘लाचलुचपत’च्या पथकाने अटक केली आहे.
अभियंता बबन कृष्णा खोत (वय 57, रा. नारायणमळा, इचलकरंजी) व पंटर किरणकुमार विलास कोकाटे (वय 46, रा. संतमळा, इचलकरंजी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या जमिनीची गुंठेवारी पोटविभागणीची फाईल इचलकरंजी नगरपालिकेत प्रलंबित होती. या फाईलवर मुख्याधिकाऱ्य़ांची सही घेऊन काम पूर्ण करून देण्यासाठी अभियंता बबन खोत याने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाचलुचपतकडे तक्रार केली होती. पडताळणीअंती लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने लाचलुचपतच्या पथकाने इचलकरंजी पालिकेत सापळा रचून लाच स्वीकारताना किरणकुमार कोकाटे याला रंगेहाथ पकडले. त्याच्या चौकशीतून खोत याचे नाव समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पुरे, विकास माने, सुनील घोसाळकर, मयूर देसाई, रूपेश माने यांनी ही कारवाई केली.
कर्मचाऱ्य़ांचे आंदोलन सुरू असतानाच कारवाई
पगार न झाल्याने नगरपालिकेचे कर्मचारी ‘काम बंद’ आंदोलन करीत बाहेर थांबले असताना, कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्य़ांनी कारवाई करीत दोघांना रंगेहाथ पकडले. बबन खोत या अभियंत्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या, तर कोकाटे हा पंटर पालिकेचा कर्मचारी-अधिकारी असल्याच्या थाटात ऑफिसमध्ये बसून काम करीत होता. अनेक फायलींचा निपटारा तोच करीत होता.




























































