बागेश्वर धाममध्ये मंडप कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, 4 जण जखमी

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध बागेश्वर धाम गढा संकुलात गुरुवारी सकाळी मंडप कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये मंडप कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला. तर 3 ते 4 जण जखमी झाले. आरतीनंतर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भाविक पाऊस पडत असताना, मंडपाखाली आडोश्यासाठी उभे राहिले होते.

मृताचे नाव श्यामलाल कौशल असे असून, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील ते रहिवासी होते. त्यांचे जावई राजेश कुमार कौशल यांनी सांगितले की, तंबूतील लोखंडी अँगल डोक्याला लागल्याने श्यामलालचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात राजेश कुमार कौशल आणि कुटुंबातील इतर सदस्य सौम्या, पारुल आणि उन्नती यांच्यासह 3 ते 4 जण जखमी झाले. सर्व जखमींना छतरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजेश यासंदर्भातील अधिक माहिती देताना म्हणाले, बुधवारी रात्री त्यांच्या कुटुंबातील 6 सदस्यांसोबत अयोध्येहून बागेश्वर धामला पोहोचले होते. (4 जुलै) धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचा वाढदिवस आहे. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. नरेश त्रिपाठी यांनी सांगितले की, मृताला बागेश्वर धाम येथून आणण्यात आले होते आणि कुटुंबीयांनी सांगितले की, हा अपघात तंबू कोसळल्याने झाला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही सर्वजण स्टेजजवळ उभे होतो, पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत आम्ही पाण्यापासून वाचण्यासाठी तंबूत आलो. पाणी भरल्यामुळे तंबू खाली पडला. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि सुमारे 20 जण तंबूखाली गाडले गेले. ही दुर्घटना बाबा बागेश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या वाढदिवसापूर्वी घडली असून यात एका भक्ताचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.