चिपळूणमध्ये ट्रकखाली सापडून युवकाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे दुचाकीस्वाराचा ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडला. किरण कृष्णा घाणेकर असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

रोलरने खड्डे बुजवित असताना ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्याने हा अपघात घडल्याची चर्चा अपघातस्थळी केली जात होती. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात यावे, यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने केली. पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. या अनुषधाने गेल्या दोन दिवसापासून चिपळूण शहरात खड्डे बुजविण्याच्या कामास सुरवात झाली. शनिवारी पाग पॉवर मार्गावरखडे बुजवविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान लोटे दिशेकडून कोंडमळ्याकडे जाणारा दुचाकीस्वार पाग पॉवर हाऊस येथे आला असता समोरून येणाऱ्या ट्रकखाली तो सापडला. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या तरूणाने हेल्मेट घातले असतानाही त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरूणाचा मृतदेह कामथे उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला आहे .