
सिग्नल मिळाल्यावर भरधाव वेगात असलेल्या टेम्पोची रस्ता ओलांडणाऱ्या कचरा वेचकाला धडक बसली. त्यात त्या कचरा वेचक वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दोन दिवसांपुर्वी हडपसर परिसरातील वैदूवाडी चौकात घडला. रजाक इमाम शेख (वय 60) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक हनुमंत फुलसुंदर याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार श्रीशैल तेलुणगी यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजाक शेख कचरा वेचक आहेत. दोन दिवसांपूर्वी रजाक पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदूवाडी चौकातून जात होते. त्यावेळी सिग्नल लागल्याने ते रस्ता ओलांडत होते. अचानक सिग्नल मिळाल्यामुळे भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. शेख खाली पडल्यामुळे टेम्पोचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

































































