मिठबाव बोलेरोची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोलेरो पिकअपची धडक बसल्याने मिठबाव येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेल्या तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास मिठबाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर घडला.

वेदांत सुनिल राणे (वय 23, रा खालचीवाडी, मिठबाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अक्षय अरुण आर्लेकर (वय 25) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी कणकवली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बोलेरो चालक महेंद्र परब याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेदांत मित्रासोबत रात्री घरी परतत होता. यावेळी समोरुन येणार्‍या बोलेरोची मागची बाजू त्याच्या दुचाकीला धडकली. या धडकेने ते दोघे रस्त्यावर कोसळले. यात गंभीर दुखापत झाल्यामुळे वेदांतचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय जखमी झाला आहे, असे तपास अमंलदार पोलीस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.