
पुण्यात टिळक रोडवर समोरून आलेल्या रिक्षाला धडकून दुचाकीस्वार तरुण खाली पडला. त्याचवेळी मागून आलेल्या पीएमपीलच्या चाकाखाली आल्याने दूध व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश तुकाराम विधाते (वय 24, रा. बाणेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा बाणेर परिसरात राहात होता. त्याचा दुधाचा व्यवसाय असून तो कुटूंबियांना मदत करत होता. कामानिमित्त तो रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून अलका टॉकीजहून स्वारगेटकडे जात होता. त्याने लिमेवाडी बोळीतून दुर्वांकुर हॉटेलजवळ दुचाकीवरून येत असतानाच अचानक समोरून आलेल्या रिक्षाची धडक बसल्याने आकाश खाली पडला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएल बसखाली आकाश आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. टिळक रस्त्यावर भरदुपारी झालेल्या अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी आकाशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.






























































