
रस्त्याने जात असताना अचानकपणे चालकाने मोटार (गाडी) थांबविल्यामुळे दुचाकीस्वार मोटारीला जाऊन धडकला. त्यामुळे मोटारीची नुकसान भरपाई मागत मोटार चालकाने दुचाकीस्वार तरूणांचे 17 हजारांचे दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना 16 एप्रिलला रात्री पावणेसातच्या सुमारास चांदणी चौक परिसरात घडली.
अविनाश पेठे (वय 28) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अविनाश आणि त्यांचा मित्र वैजनाथ जाधव हे मित्र असून 16 एप्रिलला दुचाकीवरून चालले होते. चांदणी चौक परिसरात आरोपी मोटार चालकाने अचानकपणे मोटार थांबविल्यामुळे अविनाशची दुचाकी मोटारीला धडकली. त्यामुळे मोटारीची नुकसान भरपाई म्हणून चालकाने दोघांकडे आठ हजारांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे रक्कम नसल्यामुळे मोटारचालकाने दोघांकडील 17 हजारांचे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेन मुंढे तपास करीत आहेत.



























































