जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीजवळ अपघात; तीन जण गंभीर जखमी

458

संभाजीनगर-सोलापूर महामार्गावरील जालना जिल्ह्यातील वडीगोद्री जवळ ट्रक व आयशरच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे 2 वाजेदरम्यान घडली. बीडकडून जालना येथे जाणारा आयशर वडीगोद्री टी पॉईंटहून रस्ता चुकल्याने संभाजीनगर निघाला होता. वडीगोद्री गावाजवळ रस्ता चुकल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे आयशर वडीगोद्री मार्केट यार्डजवळ राँग साईडने घुसून वळण घेऊन जात असताना संभाजीनगरहून ऊस घेवून जाणाऱ्या भरधाव ट्रकने आयशरला धडक दिली. या धडकेत आयशरमधील दोन व ट्रकमधील एक असे तीनजण गंभीर जखमी झाले आहे आहेत.

आयशरमधील ज्ञानेश्वर मोरे, गोविंद दाभडे तर ट्रकचालक किरण विठोरे हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकाद्वारे बीड येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोहेकॉ महेश तोटे, मदन गायकवाड,विशाल पगारे, नितीन खरात यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. वडीगोद्रीजवळ उड्डापुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होत असतात. या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या