परभणीत भरधाव ट्रक आणि कारची धडक ; दोन जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी-वसमत रस्त्यावर चौपाल सागर परिसरात भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. परभणीहून नांदेडकडे जाणारा ट्रकने नांदेडहून परभणीकडे येणाऱ्या कारला शहर परिसरातील चौपाल सागर परिसरात जोराची घडक दिली. या अपघातात परभणी येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी फसीयोद्दीन शेख व नरहरी कदम या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

परभणीपासून अवघ्य 2 कि.मी. अंतरावर चौपाल सागर हा मॉल आहे. या मॉलसमोरच ही घटना घडली आहे. परभणीकडून वसमतकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने कारला धडक दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. निवृत्त पोलीस अधिकारी फसीयोद्दीन शेख सेवानिवृत्तीनंतर राजकारणात सक्रीय होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. चौपाल सागर परिसरात अपघाताची चार दिवसांतली ही दुसरी घटना आहे.