सोलापूर – धुळे महामार्गावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास तेरखेडा गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हल्स व आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. टेमपो ट्रॅव्हल्समधील भाविक तिरुपतीच्या दर्शनासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

नाशिक जिह्यातील मालेगाव येथील भाविक तिरुपतीच्या दर्शनासाठी टॅम्पो ट्रॅव्हल्सने तिरुपतीकडे जात होते. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही टेम्पो ट्रॅव्हल्स संभाजीनगरहून सोलापूरकडे जात असताना तेरखेडय़ाजवळ टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. गाडीतील काही प्रवासी गाडीमध्येच बसले होते. तर काही खाली उतरले होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने उभ्या असलेल्या टेम्पो ट्रव्हल्सला धडक दिली. या धडकेने ट्रव्हल्स व आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले.

या अपघातामध्ये शरद विठ्ठलराव देवरे, विलास महादू बच्छाव, जगदीश चंद्रकांत दरेकर, सतीश सूर्यवंशी या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या संजय बाजीराव सावंत, भरत ज्ञानदेव पगार, गोकुळ हिरामण शेवाळे यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्वजण नाशिक जिह्यातील मालेगाव येथील रहिवासी असून तिरुपती दर्शनासाठी जात होते. अपघाताची माहिती मिळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे व पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्ग प्राधिकरणचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी येरमाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर जखमी प्रवाशांवर धाराशिव येथे उपचार सुरु आहेत.