सोलापूर-धुळे महामार्गावर भरधाव कार दुभाजकला धडकली; दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बायपास चौकालगत असणाऱ्या पुलावर वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव कार दुभाजकाला धडकली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यात शिवअंगणवाडी सेनेचे मराठवाडा प्रमुख दिलीप ज्ञानदेव भोसले, महेंद्र सिताराम गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

शिवअंगणवाडी सेनेचे मराठवाडा प्रमुख बीडचे दिलीप भोसले यांच्या सासूवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सासूला भेटण्यासाठी शुक्रवारी दुपारी दिलीप भोसले आणि त्यांचे मित्र खाजगी गाडीने अंबाजोगाईला गेले होते. शुक्रवारी रात्री उशिरा अंबाजोगाईहून बीडकडे परतत असताना त्याची कार सोलापूर-धुळे महामार्गावरील बायपास चौकालगत आल्यावर वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे अपघातात दिलीप भोसले ( वय 50), महेंद्र गायकवाड ( वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकांत कांबळे हे जखमी झाले आहेत. चंद्रकांत कांबळे यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलीप भोसले यांनी सामाजिक चळवळीतून मोठे प्रस्थ निर्माण केले होते. शेकडो निराधारांना आधार देण्याचे काम त्यांनी केले होते. निराधारांसाठी नेहमी धावून जाणारे दिलीप भोसले यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील तब्बल पाच हजार निराधारांना मासिक पगार सुरू झाला होता. काही महिन्यांपासून ते शिवअंगणवाडी सेनेच्या मराठवाडा प्रमुख पदाच्या माध्यमातून काम करत होते. त्यांच्या अपघाती निधनाने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.