सीएसएमटीत पनवेल लोकलला विचित्र अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल लोकल सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्र. 1 वरून सुटत असतानाच मोटरमनने अचानक लोकल रिव्हर्स घेतल्याने ती डेड एण्डला बफरवर आदळून रुळांवरून घसरल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी लोकलच्या 30 हून अधिक फेऱया रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागला.

सीएसएमटी ते वडाळा रोड आणि कुर्ला स्थानकांदरम्यान 7 लोकल अंशतः रद्द करण्यात आल्या, तर अप आणि डाऊनच्या 30 फेऱया संपूर्णपणे रद्द करण्यात आल्या, तर 35 फेऱयांना 5 ते 20 मिनिटांचा उशीर झाल्याने नोकरदारांना चांगलाच लेटमार्क बसला. दरम्यान, या लोकलच्या मोटरमनला निलंबित करण्यात येऊन सीसीटीव्हीद्वारे व इतर पुरावे तपासण्याची त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.