अपघाती मृत्यू पावलेल्या शिक्षकालाही किराणा वाटपाचे काम, बीड जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार

687
teacher-1
प्रातिनिधिक

बीडमध्ये 9 जुलैपर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना किराणा सामान आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र याबाबतच्या आदेशात 145 क्रमांकावर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बागवान गल्ली व शिक्षक कॉलनी, शाहुनगर येथील सम्राट चौकातील किराणा दुकानावर चक्क एका मयत शिक्षकाची नियुक्ती केल्याने सरकारी काम किती बेदखल असू शकते याचा प्रत्यय आला आहे.

बुधवारी बीडमध्ये तीन कोरोनाबाधित आढळल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 9 जुलैपर्यंत बीड शहर लॉकडाऊन केले आहे. या दरम्यान नागरिकांना किराणा सामान आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी 2 जुलै 2020 रोजी जारी केलेल्या आदेशात 154 क्रमांकावर प्रभाग क्रमांक नऊमध्ये बागवान गल्ली व शिक्षक कॉलनी शाहुनगर येथील सम्राट चौकातील किराणा दुकानावर मयत शिक्षक प्रशांत कुलकर्णी यांची ड्युटी लावली असून यादीत तसा उल्लेख आहे. यामुळे प्रशासनाकडूनही किती चूक होऊ शकते याचा प्रत्यय आला आहे.

शिरूर तालुक्यातील वारणी येथील केशवराज माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रशांत दिगंबर कुलकर्णी हे मानूर चेकपोस्टवर पंधरा दिवसापूर्वी कर्तव्यावर होते. रविवार 14 जून रोजी रात्री ड्युटी संपल्यानंतर तीन सहकाऱ्यांसह बीडकडे कारने येताना तागडगावजवळ झालेल्या कार अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे. मात्र त्यांचेच नाव किराणा वाटप यादीत आल्याने प्रशासनाकडूनही किती चूक होवू शकते याचा प्रत्यय आला आहे. दरम्यान शिक्षणाधिकारी अजय बहीर यांनी ही चूक झाल्याचे मान्य करत दुरूस्ती केल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या