कोलकाता आणि बदलापूर येथे बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या दोन घटनेने दिल्लीतील 2012 मधील निर्भया प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. याचवेळी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था (एनसीआरबी) ने आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, देशात भाजपशासित राज्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्थानात सरासरी प्रत्येक तीन तासाला महिलावर बलात्काराची घटना घडते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये देशात एकूण 31 हजार 516 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली. यात सर्वाधिक बलात्कार हे राजस्थानात घडले आहेत. या ठिकाणी 5399 गुन्हे दाखल झाले आहेत. राजस्थाननंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक 3690 बलात्काराची प्रकरणे समोर आली आहेत. तिसऱ्या नंबरवर मध्य प्रदेश हे राज्य असून या ठिकाणी 3029 बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
100 पैकी केवळ 27 जणांना शिक्षा
हिंदुस्थानात बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण चिंता करायला लावणारे आहे. 100 बलात्कार आरोपींपैकी केवळ 27 जणांना शिक्षा मिळते. म्हणजेच हे प्रमाण केवळ 27 टक्के आहे. 2022 मध्ये गुन्हा दाखल केलेल्या बलात्कार प्रकरणामध्ये केवळ 18 हजार प्रकरणात ट्रायल पूर्ण झाली आहे. तर 5 हजार प्रकरणात दोषींना शिक्षा मिळाली आहे. तसेच 12 हजारांहून जास्त प्रकरणांमध्ये आरोपींची सुटका करण्यात आली आहे.
राज्याचे नाव बलात्कार गुन्हे
राजस्थान – 5399
उत्तर प्रदेश – 3690
मध्य प्रदेश – 3029
महाराष्ट्र – 2904
हरियाणा – 1787
ओडिशा – 1464
झारखंड – 1298
छत्तीसगड – 1246
दिल्ली – 1212
आसाम – 1113
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 10 राज्यांत टॉपची चार राज्ये ही भाजपशासित आहे. या राज्यात वर्षानुवर्षे भाजपची सत्ता राहिलेली आहे. परंतु महिलांची सुरक्षा राखण्यात या राज्यांना सपशेल अपयश आले आहे.