
सामना ऑनलाईन । मुंबई
अॅसिड हल्ल्याच्या पीडितेशी विवाह करणाऱ्या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाकडून मुक्तता करण्यात आली आहे. हा आरोपी गेली आठ वर्षं शिक्षा भोगत होता. अनिल पाटील असं या माणसाचं नाव असून त्याने २०१०मध्ये एका तरुणीवर अॅसिड फेकलं होतं.
खेड येथे राहणारा अनिल आणि पीडिता एकमेकांना ओळखत होते. अनिल याने पीडितेला लग्नाची मागणी घातली होती. पण, तिने अनिलला नकार दिला होता. नकार मिळाल्याच्या रागात अनिलने २०१०मध्ये पीडितेवर अॅसिड फेकलं. २०१३मध्ये खेड येथील सत्र न्यायालयाने या गुन्ह्यासाठी त्याला दोषी मानत जन्मठेप सुनावली होती. अनिलने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २७ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली.
उच्च न्यायालयातील भूषण गवई आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान अनिलने पीडितेशी विवाह केल्याचं सांगितलं. तसंच तिच्या पुढील उपचारांसाठी त्वचेचं दान केलं आणि खर्चंही उचलत असल्याचंही कबूल केलं. न्यायालयाने त्याच्या या दाव्यांमागची सत्यासत्यता तपासली. तेव्हा अनिलने खरोखर पीडितेशी विवाह करत तिच्या उपचारांची जबाबदारी उचलली असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्याची जन्मठेपेची शिक्षा कमी करत त्याला मुक्त केलं. आरोपीने आधीच आठ वर्षं शिक्षा भोगली आहे, त्यामुळे इतकी शिक्षा योग्य आहे, असं नोंदवत खंडपीठाने अनिल याला मुक्त केलं.



























































