
गोळीबार आणि खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात मागील सात महिन्यांपासून फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. उत्तमनगर येथील गोळीबाराच्या गुन्ह्यात पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपीला वारजे पुल परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आकाश ऊर्फ तितल्या अनिल मुलगे (वय 21, रा. वारजे, मूळ. रा. गुलबर्गा) असे अटक केलेल्या साराईताचे नाव आहे. मुलगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील हे पथकातील कर्मचाऱ्यांसह हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान वारजे ब्रिजजवळ संशयीत आरोपी हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून मुलगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत वारजे माळवाडी आणि उत्तमनगर पोलीस स्टेशनकडील गोळीबार आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याजवळ एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, पोलीस नाईक धनंजय ताजणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.




























































