सातारा : महिलेचा हाफ मर्डर करणार्‍या फरार संशयितास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सातारा

दोन वर्षापूर्वी महिलेवर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन फरारी असलेल्या अप्पा उर्फ परमेश्‍वर महादेव मुलगे (वय 32, रा. गुरुदत्त कॉलनी, संगमनगर, सातारा) याला सातारा वाहतूक विभागाच्या कर्मचार्‍याने शिताफीने पकडून अटक केली. दरम्यान, संशयितासह यापूर्वीच चौघांना अटक झाली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद आहे.

संशयित आरोपी अप्पा मुलगे हा दोन वर्षापूर्वी बॉम्बे रेस्टॉरंट येथे त्याच्या आणखी चार साथीदारांसोबत रात्री दारू पित बसला होता. दारू पिण्यासाठी करण्यासाठी ग्लास व पाणी नसल्याने परिसरात असणार्‍या पालातील लक्ष्मी मथिया यांना ग्लास व पाणी मागितले. या महिलेचा मूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. रात्रीची वेळ असल्याने महिलेने पाणी व ग्लास देण्यास नकार दिला. यावेळी पाचही संशयितांनी महिलेशी वादावादी, शिवीगाळ व दमदाटी करुन तेथून निघून गेले. सुमारे पंधरा मिनिटानंतर मात्र अप्पा मुलगे याच्यासह सर्व संशयित कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेवून त्या महिलेच्या घरी गेले. तू पाणी व ग्लास का दिला नाहीस, असे म्हणून चिडून या पाचजणांनी कोयत्याने या महिलेच्या डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात तक्रारदार महिला लक्ष्मी मथिया या गंभीर जखमी झाल्या होत्या. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता. महिलेवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर अप्पा मुलगे पसार होता. 21 सप्टेंबर रोजी सातारा वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार सोमनाथ शिंदे यांना अप्पा मुलगे याची माहिती मिळाली. सपोनि सुरेश घाडगे यांना याबाबतची माहिती देवून एक होमगार्ड सोबत घेवून बॉम्बे रेस्टॉरंट येथे जावून शिंदे यांनी पाहिले असता अप्पा मुलगे निदर्शनास आला. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले. अप्पा मुलगे हा दोन वर्षापासून पोलिसांना हवा असल्याचे समोर आल्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.