
एकावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न करत सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केल्यानंतर पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने अटक केली. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे मित्राला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
दिपक सुभेदार परदेशी (22, रा. सोमवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुरुवारी (दि.13) दुपारी आरोपी परदेशी आणि त्याचे साथीदार एकाला मारहाण करत होते. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या एकावर परदेशी याने तलवारीने वार केला. मात्र, तक्रारदाराने वार चूकविला. यानंतर तक्रारदाराला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून आरोपी पसार झाले. गुन्हे शाखा यूनिट एकचे पथक हद्दीत गस्त घालत असताना फरार आरोपी परदेशी हा नवी पेठेत असल्याची माहिती अंमलदार निलेश साबळे, अय्याज दड्डीकर यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून परदेशीला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, यूनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अशिष कवठेकर, अंमलदार इम्रान शेख, महेश बामगुडे, अजय थोरात, अमोल पवार, तुषार माळवदकर यांच्यासह पथकाने केली.
























































