देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी आलेला आरोपी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

कळंबोली शाळेजवळ बॉम्ब ठेवल्याचा प्रकार उघडकिस आल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे आणि दारूगोळा बाळगणारे, खरेदी- विक्री करणाऱ्यांवर नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली आहे. त्या अनुषंगानेच नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. बेकायदा देशी बनावटीचा कट्टा (अग्नी शस्त्र) बाळगल्या प्रकरणी अविनाश प्रदिप जगताप (30) रा. गोठवली, रबाळे, नवी मुंबई असे या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विजय पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत अविनाश जगताप याच्याकडे पिस्तूल असून तो कोपरी गाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अविनाश जगताप याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती शाखेचे पोलीस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.