
वादातून एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार केल्यावर त्याने पळ काढला. पोलिसांनी पकडू नये याची तो सर्वतोपरी काळजी घेत होता. मोबाईल वापरत नव्हता, घरच्यांशी संपर्क साधत नव्हता. असे असतानाही धारावी पोलिसांनी इन्स्टाग्रामवर माध्यमातून सापळा रचत त्याला अटक केली. शुभम कोरी (19) असे आरोपीचे नाव आहे.
धारावीत राहणाऱया शुभमचा एका तरुणाशी वाद झाला होता. त्यावेळी शुभमने त्या तरुणाच्या गळय़ावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर शुभम पसार झाला. धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजा बिडकर, निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास शेलार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. शुभम मोबाईल वापरत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण बनले होते. दरम्यान, शुभमचे इन्स्टाग्रामवर खाते असल्याचे शेलार यांना समजले. मग शेलार यांनी तरुणीच्या नावे खाते बनवून शुभमला मैत्रीची विनंती पाठवली. शुभमला आपल्या जाळय़ात ओढले. तेव्हा तो नाशिकमध्ये असल्याचे कळताच पथकाने लगेच नाशिक गाठले. मग अंबड पोलिसांच्या मदतीने सिडको कॉलनीत शुभमला पकडले.