
बंगळुरुमध्ये मंगळवारी झालेल्या हत्याकांडाने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. कोरमंगला येथील हॉस्टेलमध्ये घुसून एक तरुणाने प्रेयसीच्या मैत्रिणीचाी हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी कसून तपास करत शनिवारी मध्य प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अभिषेक असे आरोपीचे नाव आहे.
मूळची बिहारची असलेली कृतिका कुमारी ही नोकरीनिमित्त बंगळुरुत राहत होती. कोरमंगला येथील हॉस्टेलमध्ये कृतिका राहत होती. कृतिका आणि आरोपीची प्रेयसी एकाच कंपनीत काम करत होत्या. मंगळवारी 23 जुलै रोजी आरोपी अभिषेक कृतिकाच्या हॉस्टेलमध्ये आला. अभिषेकने कृतिकाच्या रुमचा दरवाजा ठोठावला. दार उघडताच आरोपीने कृतिकाचे केस धरुन तिला बाहेर ओढले आणि तिच्यावर चाकूहल्ला केला. यात कृतिकाचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर आरोपी मध्य प्रदेशात पळून गेला. मात्र बंगळुरु पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला शनिवारी अटक केली आहे. आरोपीने प्रेयसीच्या मैत्रिणीची हत्या का केली याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. बंगळुरु पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. चौकशीनंतर हत्येचे रहस्य उलगडण्यास मदत होईल.