
हत्येप्रकरणी गेले सहा वर्षे तुरुंगात असलेल्या आरोपीला अखेर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुरेश चैत्या सावरा, असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पालघर जिह्यातील कासा पोलीस ठाण्यात 2019 मध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठासमोर सावराच्या जामीनावर सुनावणी झाली.
आदिवासी सावरा विरोधात सुरू असलेल्या खटल्यात एकूण 26 साक्षीदार आहेत. आतापर्यंत यातील केवळ चारच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. अन्य साक्षीदारांची साक्ष नोंदवायला किती दिवस लागतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सावराला जामीन मंजूर करावा, अशी मागणी अॅड. जयमंगल धनराज यांनी न्यायालयासमोर केली. ती न्यायालयाने मान्य केली.
मूलभूत अधिकारांचे हनन
खटल्याला होणाऱ्या विलंबामुळे राज्य घटनेने दिलेल्या जलद न्यायाच्या मूलभूत अधिकारांचे हनन होते. जामीन हा नियम तर कैद हा अपवाद आहे, असेही अॅड. जयमंगल धनराज यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.