साकीनाका बलात्कार, खून प्रकरणात मोहन चौहान दोषी, दिंडोशी न्यायालय 1 जूनला शिक्षा सुनावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका येथे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या अत्यंत अमानुष बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला सर्वच आरोपांमध्ये दोषी ठरवले असून त्याला 1 जूनला शिक्षा सुनावली जाणार आहे.

साकीनाका येथे खैरानी रोडवर पुठ्ठय़ाची कंपनी आहे. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने कंट्रोल रूमला फोन करून एका बाईला मारहाण सुरू असल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रूमने संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी दहा मिनिटांच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघडय़ा टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान तिच्यावर अत्यंत अमानुष पद्धतीने बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. या महिलेचा दुसऱया दिवशी 11 सप्टेंबरला मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मोहन चौहानला (45) अटक केली होती.

तब्बल 25 दिवस केला होता पाठलाग

आरोपी मोहन चौहान हा महिलेच्या परिचयाचा होता. त्याने तब्बल 25 दिवस पीडितेचा पाठलाग केला. 25 दिवस मागे राहूनही संबंधित महिला दुर्लक्ष करीत असल्याच्या रागातूनच त्याने 10 सप्टेंबरला महिलेचा दूरवर पाठलाग केला आणि निर्जनस्थळी कोणी नसल्याचा फायदा उचलत अमानुष बलात्कार आणि हत्या केली, असे पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

346 पानांची चार्जशीट

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी दिंडोशी कोर्टात 346 पानी चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये आरोपीकडे दुर्लक्ष करून प्रतिसाद दिला नसल्यानेच अत्याचार आणि निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी केवळ 18 दिवसांत चार्जशीट दाखल केली. यामध्ये 77 जणांचे जबाब नोंदवले गेले. यामध्ये पीडितेला जखमी स्थितीत पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिलेल्या सुरक्षा रक्षकाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.