भुयारी मेट्रोचे विस्तारीकरण सरकार दरबारी लटकले! सविस्तर प्रकल्प अहवालाला दोन वर्षांपासून मंजुरीची प्रतीक्षा

सध्या आरे ते वरळीच्या आचार्य अत्रे चौकापर्यंत प्रवासी सेवेत दाखल झालेल्या भुयारी मेट्रो-3 मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव सरकारदरबारी रेंगाळला आहे. कुलाबा-नेव्हीनगरपर्यंत मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल जवळपास दोन वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकार व मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन बोर्डाकडून अहवालाला मंजुरी मिळणे बाकी असल्याचे अधिकाऱ्यांकडून समजते.

कुलाबा-नेव्हीनगरपर्यंत भुयारी मेट्रोचा विस्तार करण्यासंबंधी एमएमआरसी नोव्हेंबर 2023 मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण केला होता. तो अहवाल पुढील मंजुरीसाठी राज्य सरकार आणि एमएमआरसी बोर्डाकडे सादर केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रोचा 5 किमी विस्तार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र नंतर सत्तेत आलेल्या मिंधे आणि महायुती सरकारच्या काळात विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीच्या टप्प्यावर जवळपास दोन वर्षे रेंगाळला आहे.

कफ परेड आणि कुलाबापर्यंतचा उर्वरित मेट्रो मार्ग सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. संबंधित मार्गावर काही फिनिशिंग कामे तसेच एकात्मिक चाचणी कामे सुरू असल्याचे मेट्रो प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो-3 मार्गिका पूर्णपणे बांधल्यानंतर आणि कार्यान्वित झाल्यानंतर विस्तारित मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाला मोठय़ा प्रमाणावर गती दिली जाईल, असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.