ऑक्टोपसनंतर ‘हा’ प्राणी ठरवणार फिफा विश्वचषकाचं भाकीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

अवघ्या क्रीडा विश्वाला वेध लागले आहेत ते २१व्या फिफा वर्ल्ड कपचे. ही स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे रशियात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. १४ जूनपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत कोणता खेळाडू, कोणता संघ चमकणार याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. याआधी फुटबॉल सामन्यांचा निकाल वर्तवणारा ‘ऑक्टोपस’ चांगलाच प्रसिद्ध झाला होता. मात्र आता ऑक्टोपस नाही तर चर्चा रंगली आहे ती एका मांजरीची. यंदा फुटबॉल सामन्यांमधील विजेत्या संघाबद्दल मांजर उंदीर खाऊन आपला कौल देणार आहे.

यंदाच्या फिफा विश्वचषकाचं भाकीत ठरवणाऱ्या मांजरीच नाव ‘अकिलीस’ असून तिला रशियातील हेरिमटेज संग्रहालयातून खास फिफा विश्वचषकासाठी मागवण्यात आलेलं आहे. अकिलीस सेंट पिटर्सबर्ग येथीस हेरिमटेज संग्रहालयातील दुर्मिळ चित्रांचं रक्षण करण्याचं काम करते. तसेच सामन्यातील विजेत्याबद्दल भाकित दर्शवण्यासाठी तिला रशियात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका टेबलासमोर दोन प्रतिस्पर्धी संघांचे झेंडे ठेवण्यात येणार आहेत. तसेच या झेंड्यांसमोरील वाटीमध्ये दोन उंदीर ठेवण्यात येणार आहेत. ‘अकिलीस’ ज्या वाटीमधला उंदीर खाईल तो संघ विजयी ठरेल असं भाकीत वर्तवण्यात येणार आहे.

‘अकिलीस’ने याआधी २०१७ साली झालेल्या कॉन्फिडरेशन चषक सामन्यातील ४ पैकी ३ सामन्यांना निकाल अचूक नोंदवला होता. त्यामुळे यंदा ऑक्टोपसप्रमाणे अकिलीस मांजर फिफा विश्वचषक सामन्यांचं अचूक भाकीत वर्तवणार का याकडेच साऱ्यांच लक्ष लागलं आहे.