
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी मारहाण करणे ही अतिशय आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे संबंधितांच्या विरोधात कारवाई होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सोबत काम करीत आहेत. एखाद्या लहान मोठय़ा प्रश्नावरून मतभेद झाले तर लगेच महाविकास आघाडीमध्ये काही गडबड आहे असा अर्थ काढण्याची गरज नाही. भाजपच्या विरोधात लढायचे असल्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र राहूनच काम केले पाहिजे त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात शांतता राखा
उत्तर प्रदेशात वाराणसी शहरात ज्ञानवापी मशिदीत सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या प्रश्नामुळे त्या राज्यात सामाजिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. तथापि, महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील बंधुभगिनींना माझी विनंती आहे की, धार्मिक कारणावरून आपल्या राज्यात तणाव निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यात कायम शांतता असलीच पाहिजे. पोलीस दल त्यांचे काम करीत आहेत. परिस्थितीवर त्यांचे लक्ष आहे. दरम्यान, केतकी चितळे प्रकरणावर बोलताना सोशल मीडियावर बंदीची गरज नाही, पण प्रत्येकाने संयम पाळायला हवा असेही ते म्हणाले.

























































