पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी रात्री उशीरा कारवाई करून दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ९३ लाखांची रोकड रक्कम जप्त करण्यात आली. पुणे पोलिसांनी बुकींविरूद्ध कारवाईची चाहूल लागताच पिंपरी चिंचवड, लोणावळा आणि मुंबईतील काही मोठे सट्टेबाज परागंदा झाल्याची चर्चा आहे. गणेश भिवराज भुतडा (वय 50, रा. त्रिमूर्ती सोसायटी, रास्ता पेठ) आणि अशोक भवरलाल जैन उर्फ देहूरोडकर (वय 48, रा. मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आयपीएल सामन्यादरम्यान कोट्यावधींचा सट्टा लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके आणि पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गुन्हे अन्वेषण विभागासह सामाजिक सुरक्षा शाखेतील पथकांनी एकाचवेळी कारवाई करून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून भुतडा आणि जैन यांना ताब्यात घेतले. दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यावर सट्टा घेणारे मोठे बुकी म्हणून ओळखले जातात. सध्या दुबईत सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांवर ते मोठी उलाढाल करीत होते. त्यानुसार पथकाने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्रिमुर्ती सोसायटीत छापा टाकून गणेश भुतडा याला ताब्यात घेतले. तो क्रिकेट एक्सचेंज अॅपवर ऑनलाईनपणे सट्टा घेत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे 92 लाखांची रोकड जप्त करण्यात आले. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून अशोक जैन याला ताब्यात घेतले. तो क्रिकेट लाईव्ह गुरू अॅपवर ऑनलाईन सट्टा घेत होता. त्याच्याकडून 52 हजारांची रोकड आणि ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त पोलीस भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या पथकाने केली.
आयपीएल सामन्यावेळी सट्टेबाजीची माहिती समजताच वेळ न दवडता तत्काळ कारवाई केली. त्यानुसार यामध्ये असलेल्या दोघा आरोपीना अटक करण्यात येईल. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त



























































