
दिव्यातील बेकायदा शाळांविरोधात अधिकृत शाळा संचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच खडबडून जाग आलेल्या ठाणे पालि का अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. येत्या आठ दिवसांत बेकायदा शाळांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेने दिले असून उद्या 1 जुलैपासून सुरू होणारा बेमुदत बंद अखेर मागे घेण्यात आला आहे.
दिव्यात बेकायदा शाळांचे पेव फुटले असून या शाळांची संख्या 69 वर येऊन पोहोचली आहे. अधिकृत शाळा संचालकांनी अनेकदा ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तसेच या शाळांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पालिकेच्या शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने इंडिपेंडेंट स्कूल संघटनेने बेकायदा शाळांविरोधात बेमुदत बंदची हाक दिली. शिक्षण विभागाने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र संघटनेने बेमुदत बंद करणारच, असा निर्धार केल्यानंतर शिक्षण विभागाने दिव्यातील बेकायदा शाळांवर येत्या आठ दिवसांत ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शिक्षण विभागाने याआधी दोन वेळा आश्वासन देऊनही या बेकायदा शाळांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या फसव्या आश्वासनांमुळे संघटनेने ‘बेमुदत बंद’ आंदोलन पुकारले होते. आता प्रशासनाने आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. भविष्यात या बेकायदा शाळांवर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करू. – उत्तम सावंत, खजिनदार, इंडिपेंडेंट स्कूल संघटना