जालन्यात दुकानदाराने केले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; प्रशासनाकडून दुकान सिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यात कोरोनासंसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा निर्बध जारी केले आहेत. त्यात शनिवार व रविवार असे दोन दिवस कडकडीट बंद ठेवण्याचे आदेश असताना जालन्यातील काही दुकानदारांनी शनिवार सकाळपासून दुकाने सुरू केली होती. त्यात आकाश गारमेंट या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. नगर पालिका व कदीम जालना पोलिसांनी कारवाई करत 15 दिवसांसाठी दुकान सिल केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकान मालकांवर पोलीस प्रशासन आणि पालिका कर्मचारी यांच्या वतीने कारवाईचा बडगा उचलला जात आहे. शहरातील जूना मोंढा भागातील आकाश गारमेंट या मोठ्या दुकानावर सदर बाजार पोलीस आणि पालिका पथकाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली. सोमवार ते शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे शनिवार व रविवार दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत. मात्र, व्यापारी नियम पाळत नसून शनिवारीही दुकाने सुरू केल्यामुळे सदर बाजार पोलीस आणि पालिका पथकाने दुकान सिल केले. हे दुकान 15 दिवसांसाठी सिल केले असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक विलास गावंडे यांनी दिली.

हे दुकान 15 दिवसासाठी सील करण्यात आली असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पथकातील अधिकाऱ्याने सांगितले. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश झलवार, सोनवणे तसेच नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.