
मुंबईच्या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढलेले असताना वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारला अपयशच येत आहे. गेल्या 13 महिन्यांत शहरातील रस्त्यांवर तब्बल 65 लाख 12 हजार 846 वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करीत 526 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग, हिट अँड रन, बेदरकार ड्रायव्हिंग यांसारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. यात अनेकदा पादचाऱ्यांचे हकनाक बळी जाताहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मात्र कारवाई करण्यासाठी यंत्रणा सक्षम ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. परिणामी, 1 जानेवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 65 लाखांहून अधिक चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागवली होती. वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना 526 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. परंतु, त्यातील केवळ 157 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला असून 369 कोटींचा दंड वसूल करण्यात सरकारी यंत्रणा असमर्थ ठरली आहे.
वाहतूक पोलीस दलात कर्मचारी-अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत नाही. दंड न भरलेल्या चालकांवर कठोर कारवाई करीत विशेष वसुली मोहीम राबवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली.
44 लाख वाहनचालकांनी अद्याप दंड भरला नाही!
26 प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणांत 41 वाहतूक आणि 1 मल्टिमीडिया विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. यादरम्यान केवळ 20 लाख 99 हजार वाहन चालकांनी दंड भरला, तर तब्बल 44 लाख 13 हजार 450 वाहनचालकांनी अद्याप दंड भरला नाही.
फ्लिकर व अंबर दिव्यांवर कारवाई
फ्लिकर व अंबर दिवे वापरणाऱ्या 47 वाहनचालकांवर कारवाई करीत 23,500 रुपये दंड ठोठावला. त्यातील अवघ्या 7 वाहनचालकांनी 3,500 रुपये दंड भरला. मरीन ड्राइव्ह परिसरात 32 वाहनांवर कारवाई करण्यात आली.































































