
प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेता अजित भगत यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. प्रायोगिक चळवळ जिवंत ठेवणारा, नाटकासाठी आयुष्य वेचणारा सच्चा रंगकर्मी अशी त्यांची ओळख होती. ‘जांभूळ आख्यान’सारखी प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली अनेक नाटके भगत यांनी दिग्दर्शित केली. त्यांच्या तालमीत अनेक शिष्य घडले. भगत यांच्या निधनाने नाटय़सृष्टीतून शोक व्यक्त होत आहे.
अजित भगत यांना महिनाभरापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारानंतर ते घरी परतले होते. मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रा भगत आहेत. त्यांच्या पार्थिवावर कांदिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरू पंडित सत्यदेव दुबे यांच्याप्रति असलेली आत्मीयता भगत यांच्या बोलण्यात नेहमी असायची. ‘आर्य चाणक्य’, ‘जांभूळ आख्यान’, ‘सगेसोयरे’, ‘रोमन साम्राज्याची पडझड’, ‘सापत्नेकराचं मूल’, ‘मुंबईचे कावळे’, ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘झाला अनंत हनुमान’, ‘अरण्य-किरण’ अशी प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली अनेक नाटके भगत यांनी दिग्दर्शित केली. दिग्दर्शनाबरोबर अभिनय क्षेत्रही त्यांनी गाजवले. ‘मॅड मॅड मर्डर’, ‘एक वाडा झपाटलेला’ आदी मालिका तसेच पंडित सत्यदेव दुबे यांच्या ‘इसापचा गॉगल’ नाटकातील त्यांच्या अभिनयाचे खूप काwतुक झाले. ‘पंपनी’ आणि ‘मुंबई मेरी जान’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला.


























































