
> राज चिंचणकर
विविध चित्रपट करताना अनुभवलेल्या घटना रंगवतोय… अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक
आतापर्यंत मी केलेल्या चित्रपटांच्या निमित्ताने विविध प्रकारच्या घटना मला अनुभवता आल्या. असाच एक अनुभव आहे, तो ‘हिरकणी’ चित्रपटाच्या वेळेचा! या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही 31 डिसेंबरला रायगडावर गेलो होतो. वास्तविक, त्यानंतर दोन दिवसांनी शूटिंगला सुरुवात होणार होती, पण सगळी व्यवस्था बघायला आम्ही आधीच रायगडावर पोहोचलो. संध्याकाळ जशी जवळ आली, तसतशी शिवप्रेमींची आणि गडप्रेमींची गर्दी तिथे वाढायला लागली. त्या गर्दीला कळायला नको की इथे मी आलोय किंवा सोनाली कुलकर्णी आलेली आहे; म्हणून आम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन बसलो होतो, पण कसे काय माहीत नाही; पण बातमी बाहेर फुटलीच. त्यानंतर अचानक दहा-पंधरा लोक रूमवर आले. त्यांनी दरवाजा वाजवला. ‘काय काम आहे’ असे माझ्या बायकोने त्यांना विचारले. ते म्हणाले की ‘आम्हाला कळले आहे की प्रसाद ओक इथे आलेत. त्यांना भेटून एक छोटी भेट द्यायची इच्छा होती.’ बायकोने त्यांचा निरोप मला सांगितला. मग मी पण चला बघू या काय आहे ते, म्हणून बाहेर गेलो. मला बघून त्या लोकांना प्रचंड आनंद झाला. ते म्हणाले की ‘आम्ही गडसंवर्धक, शिवप्रेमी आहोत. दर 31 डिसेंबर हा दिवस कुठल्या तरी गडावर आम्ही साजरा करतो. यंदा आम्ही रायगडावर आलो आहोत. दरवर्षी 1 जानेवारीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तम चित्र असलेली फ्रेम सर्व शिवप्रेमींना भेट देतो. तर त्याची सुरुवात आज तुमच्यापासूनच करावी म्हणून आम्ही महाराजांची फ्रेम तुम्हाला भेट द्यायला आलो आहोत.’
माझ्या मनावर हा प्रसंग इतका कोरला गेला; म्हणजे उद्यापासून ‘हिरकणी’चे शूटिंग मी सुरू करतोय आणि आज महाराजांची उत्तम अशी फ्रेम हातात मिळते म्हणजे हा कळत न कळत महाराजांचा आपल्या या चित्रपटाला मिळालेला आशीर्वाद आहे, असे मला त्या क्षणी अत्यंत मनापासून वाटले. तेव्हाचे हे असे वाटणे खरेच असावे. कारण एकंदरीत त्यानंतर ‘हिरकणी’ला मिळालेले यश! ‘हिरकणी’ला लोकांनी उचलून धरले आणि त्यात मी साकारलेली महाराजांची भूमिकाही लोकांना विलक्षण आवडली. मला असे वाटते की, त्या रात्री हातात आलेल्या फ्रेमरूपी आशीर्वादामुळेच ते घडले असावे.
तसेच एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही 20-22 दिवस नेपाळमध्ये होतो. त्या शूटिंगच्या दरम्यान दिवाळी आली होती. देशाबाहेरचे शूटिंग आणि त्या दिवाळीला जवळचे असे कुणीच नाही, अशी सल मनात होती. मी दिवाळीचे फराळ ‘मिस’ करत होतो. आमचे शेडय़ूल सुरू झाल्यानंतर आठ-दहा दिवसांनी दिवाळी होती आणि शूट सुरू झाल्यावर पाच-सात दिवसांनी आमच्याबरोबर अमिता खोपकर शूटिंगसाठी येणार होती. गंमत म्हणजे, अमिताने येताना तिच्या सगळय़ा सामानासोबत आम्हाला सगळय़ांना पुरेल इतके चिवडा, लाडू, चकल्या, फरसाण असे सर्व काही प्रचंड प्रमाणात घेऊन आली. इतकेच नाही, म्हणजे फक्त खाण्याचे पदार्थच नव्हे; तर उटणेसुद्धा ती घेऊन आली. तिने मला व पुष्करला दिवाळीत उटणे लावले. अक्षरशः घरचे कुणीतरी आले आहे आणि अगदी घरच्यासारखे, आईच्या मायेने परदेशातसुद्धा आपल्यासोबत कुणीतरी आहे, ही भावना अमिताच्या रूपाने तेव्हा प्रचंड उफाळून आली. त्या प्रसंगासाठी अमिताला मी कधीही विसरू शकत नाही.
























































